22 June 2018

आमची खेळण्याची जागा आम्हाला परत द्या! पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदाराकडे मिरारोडच्या चिमुरड्यांची मागणी





मिरारोड - मिरारोडच्या शांतीपार्क - गोकुळ व्हिलेज मधील रहिवाशांच्या हक्काच्या आरजी जागेत अतिक्रमण करुन बांधलेल्या दोन बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करु नये म्हणुन भाजपाने पालिकेवर दबाव टाकला असताना दुसरीकडे सदर जागेत जाऊन लहान मुलांनी मात्र आमच्या खेळण्याची जागा परत करा असं साकडं थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार यांना घालत निदर्शने केली. तर शासनासह उच्च न्यायालयाचे बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाईचे स्पष्ट आदेश असताना आमच्या जागा बळकावण्यासाठी राजकारण करणाऱ्यांचा निषेध करीत असल्याचे रहिवाशी म्हणाले. यामुळे रहिवाशांच्या जागांवर डल्ला मारणाऱ्याना धार्मिक मुद्याआड पाठींबा देणाऱ्या  सत्ताधारी भाजपासह महापालिकेच्या भुमिकेकडे आता नागरीकांचे लक्ष लागले आहे.  

मिरारोडच्या शांतीपार्क वसाहती मधल्या गोकुळ व्हिलेज मधील एका आरजी जागेत दोन मोठया धार्मिक स्थळांची अनधिकृत बांधकामे झाली आहेत.  2005 - 2006 पासुन पालिकेने या बेकायदा बांधकामांना नोटीसा बजावल्या. तत्कालिन आयुक्तांनी विकासक, धार्मिक स्थळ संचालक व रहिवाशी यांची बैठक बोलावुन वाढिव बांधकाम तोडण्याचे सर्वानी मान्य करुन देखील काहीच झाले नाही. 2012 साली तत्कालिन उपायुक्त सुधिर राऊत यांनी आरजी जागेतील दोन धार्मिक स्थळं अनधिकृत ठरवत तोडण्याचा आदेश दिला होता. पण तरी देखील पालिकेने कारवाई केली नाही. 

2015 साली तर पालिकेने सदर आरजीच्या जागा चक्क अनधिकृत बांधकाम न हटवताच देखभालीच्या नावाखाली विकासका सोबत करारनामा करुन ताब्यात घेतल्या. त्यातच सत्ताधारी भाजपाने महासभेत ठराव करत अतिक्रमण करुन बेकायदा बांधकाम करणाऱ्या  संस्थेलाच सदर आरजी जागा देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचे मंजुर केले.  काँग्रेस समर्थक नगरसेवक राजीव मेहरा यांनी आरजीची जागा मंडळास देण्या बद्दलची वस्तुस्थितीची विचारणा केली असता अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांनी सुनावणी घेउन सदर दोन्ही धार्मिक स्थळावर कारवाईचे आदेश दिले.  

रहिवाशांच्या जागेत कब्जा करुन धार्मिक स्थळं बांधलेल्या संचालकांसह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी आदींनी महापालिकेत जाऊन उपायुक्तांना कारवाई न करण्याचा इशारा दिला. काहींनी तर विटेला हात लावला तर आत्मदहन करुन असा दम भरला.  शांतता भांग करण्याचा त्यांचा डाव आहे,  केवळ विशीष्ट धार्मिक स्थळांवर  एकतर्फी कारवाई नको आदी मागण्या केल्या. या मुळे विशीष्ट धार्मिक स्थळं लक्ष्य केली जात असल्याचे चित्र उभे करत राजकिय फायद्यासाठी धार्मिक भावना भडकावण्याचा प्रकार भाजप करीत असल्याची टिका केली जात आहे. 

दरम्यान येथील रहिवाशी व लहान मुलांनी सदर आरजी जागेत जाऊन निदर्शने केली. ही जागा आमच्या खेळण्यासाठी आहे व ती आम्हाला परत द्या अशी मागणी त्यांनी थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री व आमदार यांच्याकडे केली आहे. आमची खेळण्याची जागा असताना आम्ही रस्त्यावर का खेळायचे? असा सवाल देखील या मुलांनी केलाय . 

आरजीची जागा आमच्या हक्काची असुन त्यात अतिक्रमण करुन झालेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणुन दबाव टाकणाऱ्या राजकिय पक्षाच्या नगरसेवकां बद्दल  स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे .  



आज ही जागा काही कोटी रुपये किमतीची असुन जर अनधिकृत धार्मिक स्थळांचा तुम्हाला इतकाच पुळका आहे तर तुमच्या मालकीच्या जागेत ती बांधुन द्या असे रहिवाशांनी भाजपा नगरसेवकांना सुनावले आहे.  येथील इमारती जुन्या झाल्या असुन पुर्नविकास करायला घेऊ तेव्हा आरजीच्या जागा अतिक्रमण मुक्त व आमच्या ताब्यात असतील तरच आम्हाला पुर्नविकास फायदेशीर ठरणार असल्याचं देखील काहींनी बोलुन दाखवलं. राजकिय रंग देऊन धार्मिक तणाव निर्माण करु नका अशी मागणी सुध्दा त्यांनी केली.